२००४ मध्ये शब्द पब्लिकेशनची सुरुवात. त्याच वर्षी ‘शब्द दीपोत्सव’ हा दिवाळी अंक सुरू केला.
२००९ साली महाराष्ट्र शासनाने शतकोत्तर दिवाळी अंक परंपरेनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘शब्द दीपोत्सव’ या अंकाला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र २०१५ साली शासनाच्या निषेधार्थ हा पुरस्कार शासनाला परत केला.
१ मे २०१० रोजी ‘मुक्त शब्द’ हे साहित्य, संगीत, कला, सामाजिक, राजकीय विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखन प्रसिद्ध करणारे नियतकालिक सुरू करण्यात आले.
शब्दने विविध विषयांवरील चर्चासत्रांचेही आयोजन मुंबईत आणि मुंबईबाहेरही केले आहे.
साहित्य क्षेत्रातील उपक्रमांबरोबरच सामाजिक भान जपणे ‘मुक्त शब्द’ आणि शब्द पब्लिकेशनला अतिशय महत्त्वाचे वाटते.
येशू पाटील यांच्या पत्नी मेरी पाटील यांच्या स्मरणार्थ २०१५पासून आदिवासींसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरवर्षी २७ नोव्हेंबर रोजी पुरस्कार प्रदान समारंभ आणि मेरी पाटील स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते.
आतापर्यंत शब्द पब्लिकेशनची पावणेदोनशेच्या वर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. शब्द पब्लिकेशनच्या चार पुस्तकांना साहित्य अकादमी मुख्य पुरस्काराने तसेच चार पुस्तकांना साहित्य अकादमी युवा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याखेरीज महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार अशा अनेक मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा समावेश आहे.